ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २७ - तिकीट मागितले म्हणून प्रवाशांनी टीसीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शालीमार एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिकीट निरीक्षक चुनीलाल गुप्ता यांना उपचारांसाठी तातडीने इगतपुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भूसावळ येथे ड्युटीवर असलेले गुप्ता बुधवारी रात्री तिकीट तपासण्यासाठी हावडा ते लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेसच्या डब्यात चढले. नाशिकरोडहून रात्री साडेबाराच्या सुमारास गाडी सुटल्यानंतर त्यांनी दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना दार लावून घेण्यास सांगत तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिकीट दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर गुप्तांनी त्यांना जनरल बोगीत जाण्यास सांगितले असता त्या प्रवाशांना राग आणि एकाने गुप्तांच्या चेहे-यावर वस्त-याने वार केले. त्यामुळे गुप्ता जबर जखमी झाले आणि जबर गोंधळ उडाला. गाडी देवळाली स्टेशनजवळ पोहोचताचे ते दोघे आरोपी उडी मारून फरार झाले. इतर प्रवाशांनी गुप्तांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.