नवीन नियमाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढणार नसल्याने जनरल जागांची संख्या मात्र वाढणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्र्यंबक नगर परिषदेची मुदत डिसेंबर २०२२ ला संपणार असली तरी निवडणुका मात्र नोव्हेंबर २०२२ लाच होतील. त्याप्रमाणे इच्छुकांनी आतापासूनच निवडणूक वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मात्र इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे चुरस वाढणार आहे.
शहरातील लोकसंख्यानुसार अनु.जाती १, अनु.जमाती ६ व ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) २ असे नऊ आरक्षित सदस्य झाल्यानंतर उर्वरित आठ जागांवर सर्वसाधारण (जनरल) गटातून निवडणुका लढवल्या जातील. त्यातही महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांची संख्या आठ राहणार आहे. अर्थात ही संख्या मागच्या वर्षी नऊ होती, ती या पंचवार्षिकमध्ये आठ होणार आहे. अनु.जातीमध्ये मागच्या पंचवार्षिकला महिला आरक्षित होती. या वेळेस मात्र पुरुष किंवा महिला कोणीही निवडणूक लढवू शकतात.
पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसल्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी केवळ दोनच जागा असणार आहेत. त्यामुळे आता जनरल जागांवर रस्सीखेच होणार आहे. सन २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने सिंहस्थ नियोजन सन २०२२ मध्ये निवडून येणाऱ्या बाॅडीलाच करावे लागणार असल्याने अनेक इच्छुकांची निवडणूक लढविण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे. सिंहस्थाचे तीनही पर्वकाल २०२७ मध्येच होतील, तर त्या वेळच्या कौन्सिलची मुदतही डिसेंबर २०२७ लाच संपणार आहे.