नाशिकरोड : मुंबई-ठाणे भागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडालेल्या मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक सेवा शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील पूर्णपणे विस्कळीतच होती. नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर मुंबईहून सुटणाऱ्या सर्वच गाड्या ८-१० तास उशिराने धावत होत्या. अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने व रेल्वे प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचे दुसऱ्या दिवशीही अतोनात हाल झाले.चार दिवसांपूर्वी बुधवारी पहाटे मध्य प्रदेश इटारशी रेल्वेस्थानकांवरील रुट रिले इंटर लॉकिंग पॅनलला आग लागल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने इटारसीवरून खंडवामार्गे नाशिक- मुंबईला येणाऱ्या रेल्वे या इटारसीवरून भोपाळ, उज्जैन, वडदोरा, वसईमार्गे मुंबईला सोडण्यात येत आहे, तर मुंबईहून नाशिक, खंडवामार्गे इटारसीहून पुढे जाणाऱ्या रेल्वे या गाड्या मुंबई, कल्याण, वसई, वडदोरा या मार्गे इटारसीला सोडण्यात येत आहे. रुट रिले इंटर लॉकिंग पॅनलचे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे. त्यातच शुक्रवारी मुंबई-ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेची दाणादाण उडून गेली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शनिवारी सकाळी इगतपुरीला रद्द करून पुन्हा माघारी बोलविण्यात आली. तर गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस या मनमाडलाच रद्द करण्यात आल्या होत्या. इटारसी-भुसावळ-नाशिक मार्गे मुंबईला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या यांचे मार्ग बदलण्यात आल्याने शुक्रवारपासून बहुतेक गाड्या नाशिकला आल्याच नाहीत. या मार्गे काही आलेल्या गाड्या या ५-६ तास उशिरा टप्याटप्याने धावत होत्या.औरंगाबाद-मुंबई तपोवन एक्स्प्रेस शुक्रवारी देवळाली रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आली. ही तपोवन एक्स्प्रेस देवळालीहून पुन्हा शनिवारी औरंगाबादला रवाना झाली. शुक्रवारी रात्री अडीच वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणारी नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस सात तास उशिराने शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आल्यावर रद्द करण्यात आली. शनिवारी तिच्या निर्धारित वेळेला रात्री १०.४० वाजता नाशिकरोडहून विदर्भ एक्स्प्रेस नागपूरला रवाना झाली. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस शनिवारी सकाळी निफाड रेल्वे स्थानकावर रद्द करण्यात येऊन सायंकाळी ७ वाजता निफाडवरून पुन्हा नागपुरला रवाना झाली. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीतच
By admin | Updated: June 21, 2015 01:47 IST