नाशिक : नाशिक मेट्रोसाठी शहराचा नागरी वाहतुकीविषयक सर्वंकष आराखडा जास्तीत जास्त तीन महिन्यांत प्राप्त करून नाशिकला मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रक्रि या सुरू केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे सदस्य जयवंत जाधव यांच्या लक्षवेधीवर बोलताना दिले.आमदार जयवंत जाधव यांनी नाशिक मेट्रोबाबत लक्षवेधी मांडली होती. शहराचा वाढता विस्तार, वाढती वाहने, वाहतुकीची कोंडी यामुळे नाशिक शहरात रॅपिड रेल्वे किंवा मेट्रोची नितांत आवश्यकता आहे. शासनाने दि. ६ डिसेंबर २०१४ रोजी नाशिक शहरातील नागरी वाहतुकीविषयक सर्वंकष अभ्यास करून घेण्याबाबत नाशिक महानगरपालिकेस सूचना दिल्या आहेत. मात्र महापालिकेच्या स्तरावर प्रचंड दिरंगाई झाली. त्यांनी वाहतूक आराखडा तयार करण्याच्या कामास दि. २७ एप्रिल २०१६ रोजी वर्कआॅर्डर दिली आहे. त्यास आता वर्ष पूर्ण होत आले आहे, मात्र खासगी तज्ज्ञ सल्लागार कंपनीने अद्यापही अभ्यास अहवाल सादर केलेला नसल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले, नाशिकमधील लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करून शासनाने नाशिक शहरातील नागरी वाहतूक विषयक सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याबाबत नाशिक महापालिकेस सूचना दिलेल्या आहेत. आराखडा तयार करणेसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
नाशिक मेट्रोसाठी वाहतूक आराखडा : रणजित पाटील :
By admin | Updated: April 1, 2017 20:32 IST