सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आली.बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात कंटेनर नादुरुस्त झाला. त्यात वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली. मोहदरी घाटापासून सिन्नरच्या व नाशिकच्या दिशेने तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महामार्ग पोलीस आल्यानंतर त्यांनी वाहनचालकांना शिस्त लावल्यानंततर सुमारे दहा वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र रात्री सुमारे तीन तास वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात रस्ता रुंदीकरणासाठी भूसुरुंग स्फोट घेण्यात आले. त्यामुळे दुपारी एक ते दीड तास वाहतुकीची कोंडी झाली होती. नाशिक-पुणे महामार्गाचे काम सुरू असल्याने अगोदरच अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असतो. त्यात मोहदरी घाटात वाहन नादुरुस्त झाल्यानंतर वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडते. मोहदरी घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, आणखी काही दिवस या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)
मोहदरी घाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
By admin | Updated: July 29, 2016 00:24 IST