घोटी : संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असताना दुष्काळ निवारणार्थ राज्य आणि केंद्रातील सरकार उपाययोजना करण्यास हतबल ठरत असल्याच्या निषेधार्थ आज इगतपुरी तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले व काहीकाळ महामार्ग रोखून धरला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना ताब्यात घेतले व तासाभरानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. उदय जाधव यांच्यासह मा. अर्थ व बांधकाम सभापती अलका जाधव, बाळासाहेब गाढवे, नामदेव वाघचौरे, अनिता घारे आदिंनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंनी जेलभरो आंदोलन केले. इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा आदि मागण्यांसाठी इगतपुरी राष्ट्रवादी कॉँंग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव येथे राष्ट्रवादीच्य कार्यकर्त्यांनी उदय जाधव, अलका जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या मांडला. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनात राजू गतीर, कारभारी नाठे, सौ. गोसावी, ज्योती भोर, शेखबाई, दीपक नागरे, प्रताप जाधव, नामदेव शिंदे, विजय भोर, साहेबराव गायकर, सखाराम गायकर आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना अटक केली व नंतर सुटका केली. (वार्ताहर)
मुंढेगाव येथे रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: September 16, 2015 00:01 IST