नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदचा सण मंगळवारी (दि.१३) साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सणाच्या पूर्वसंध्येला आज (दि.१२) संध्याकाळी घरांमध्ये विशेष गोड खाद्यपदार्थ तयार करून फातिहा पठण करणार आहेत. ईदनिमित्त नागरिकांनी घरांची साफसफाई, रंगरंगोटी केली असून, जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम बहुल भागांमध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी ईदच्या शुभेच्छा फलकही झळकविण्यास सुरुवात केली आहे. इदगाह मैदानाचे महापालिकेच्या वतीने सपाटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला पावणेदहा वाजता प्रारंभ होणार आहे. मुस्लीम बांधवांच्या मोठ्या सणांपैकी हा एक महत्त्वाचा सण आहे. नागरिकांनी ईद शांततेत साजरी करावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ईदगाह समितीच्या वतीने सय्यद मीर मुख्तार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
उद्या शहरात सामूहिक नमाजपठण
By admin | Updated: September 12, 2016 01:52 IST