पंचवटी : भारत- पाक सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे नाशिकहून पाकिस्तानला जाणाऱ्या टमाट्याची निर्यात घटली आहे. पंधरवड्यापासून पाकिस्तानात मोजकाच टमाट्याचा माल जात असल्याने बाजारभाव कोसळले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याला अवघे चार रुपये किलो इतका भाव मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा मालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असली तरी बाजारभाव कोसळल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीत टमाट्याला प्रति २० रुपये किलोच्या जाळीला ८० ते १२० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. सध्या टमाट्याचा हंगाम असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र पाकिस्तानात टमाट्याची निर्यात घटल्याने स्थानिक बाजारपेठेत टमाट्याचे बाजारभाव कोसळले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात टमाटा निर्यात केला जातो; मात्र काही दिवसांपासून भारत-पाक सीमारेषेवर सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे टमाट्याची निर्यात घटली आहे. दरवर्षी या हंगामात टमाट्याच्या २० किलोच्या जाळीला साधारणपणे ८०० ते ९०० रुपये असा बाजारभाव मिळतो, मात्र सीमारेषेवर असलेल्या तणावजन्य वातावरणामुळे व्यापारी माल खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. व्यापारी टमाटा माल खरेदी करत असले तरी तो टमाटा माल पाकिस्तानला न पाठविता पंजाब, हरियाणा या राज्यांत पाठवित आहेत.
सीमेवरील तणावामुळे टमाटा माघारी
By admin | Updated: November 8, 2016 00:59 IST