नाशिक : मोबाइलवर बोलू न दिल्याचा राग येऊन सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण व त्याच्या तिघा सहकार्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना न्यायालय आवारात मारहाण करून त्यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, यातील चौघांवर पोलीस उपनिरीक्षकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या सर्वांची आज मोक्का न्यायालयात तारीख होती़सप्टेंबर २०१२ मध्ये अंबडला झालेल्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या लुटीतील संशयित आरोपी समीर नासीर पठाण, नागेश भगवान सोनवणे, गणेश सुरेश वाघ, सोनल रोहिदास भडांगे, नितीन बाळकृष्ण काळे, सुनील भास्कर अनर्थे, सुनील दौलतराव खोकले, अनिल पंडित अहेर यांची आज मोक्का न्यायालयात तारीख होती़ या सर्वांना मध्यवर्ती कारागृहातून पोलीस उपनिरीक्षक सावंत व सहकार्यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास न्यायालयात आणले़ न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर संशयितांना पुन्हा तुरुंगात घेऊन जाण्यासाठी गाडीत बसवत असताना संशयित सुनील अनर्थे हा नातेवाईकांकडे मोबाइल मागत होता़ त्यास पोलीस नाईक गुंबाडे यांनी मज्जाव केला. या गोष्टीचा राग येऊन संशयित पठाण, अनर्थे, सोनवणे, काळे हे गुंबाडे यांच्या अंगावर धाऊन गेले़ याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत हे विचारणा करण्यासाठी गेले असता संशयितांनी सावंत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ यापूर्वीही एका अधिकार्याला मारहाण केली असून आम्हाला काहीही झालेले नाही, असे म्हणत सावंत यांच्या पोटावर व छातीवर मारहाण केली़ यावेळी पठाण याचे नातेवाईक व मित्रमंडळींनी मारहाण केली. यानंतर पठाणने सावंत यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचाही प्रयत्न केला़या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण, सुनील भास्कर अनर्थे, नागेश भागवत सोनवणे, नितीन बाळकृष्ण काळे, पठाणची आई, नातेवाईक व मित्रपरिवाराविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
टिप्पर गँगकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण
By admin | Updated: May 7, 2014 22:14 IST