नाशिक : बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा ८१ वा वाढदिवस तिबेटियन बांधवांनी साजरा केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नगरसेवक उत्तम कांबळे उपस्थित होते. तिबेटियन मार्केट येथे आयोजित वाढदिवस कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जगाच्या कल्याणासाठी यावेळी तिबेटियन बांधवांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष फुनस्टोक न्यामग्येल यांनी दलाई लामा, भारतातील आश्रय आणि तिबेटच्या संघर्षावर विवेचन केले. फुनस्टोक न्यामग्येल म्हणाले की, दलाई लामा यांनी तिबेटियन बांधवांच्या हक्कासाठी जीवनभर संघर्ष केला. याप्रसंगी तिबेटियन भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर केले. तिबेटियन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फनुछोक छोटेन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस तिबेटियन बांधवांनी साजरा केला
By admin | Updated: July 7, 2016 00:31 IST