नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ या अत्यंत लोकप्रिय नाटकाचा खेळ आयोजित केला होता. किंबहुना नाशिकचा तत्कालीन ए.एम.टी. जॅक्सन याच्यासाठी हा विशेष प्रयोग होणार असल्याने तिथे जॅक्सन येणार हे निश्चित होते. त्यामुळेच या विनायकराव देशपांडे, अण्णा कर्वे आणि अनंत कान्हेरे या तिघा तरुणांनी अत्यंत नियोजनबद्धपणे मान्यवराच्या खुर्चीच्या जवळपासच्या आणि नजरेच्या टप्प्यातील जागा पकडल्या होत्या. कान्हेरे तर जॅक्सनच्या बरोबर मागील खुर्चीतच बसले होते. निर्धारित वेळेवर नाटकाचा पडदा उघडला, नाटकाची नांदीही झाली तरी जॅक्सन न आल्याने तिघा तरुणांच्या मनात काहीशी चलबिचल झाली. इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला. अन प्रमुख पाहुण्यांच्या पहिल्या रांगेतील मानाच्या जागी स्थानापन्न झाला. त्यासरशी अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तिघे तरुण विनायकराव देशपांडे, अण्णा कर्वे अन् त्यातला सर्वात लहान असलेल्या अवघ्या १९ वर्षांच्या तेजस्वी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाचे डोळे त्या अंधारातही चकाकले. बाबाराव सावरकरांना दिलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचा बदला हे उद्दिष्ट आणि जॅक्सनच्या कृतीचा प्रतिशोध घेण्यासाठी ते सज्ज झाले. तिकडे मंचावर नाटकाचा प्रवेश सुरू झालेला असतानाच मंचासमोरील अंधारातून गोळ्यांचे धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले. तत्क्षणी विजयानंदमध्ये हलकल्लोळ उडाला, ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला होता. कान्हेरेंनी जॅक्सनसमोर उभे राहून त्याच्या छातीत चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत केला. नियोजनानुसार विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले, पण अनंत कान्हेरे हा जॅक्सनसमोरच उभा होता. त्याने जॅक्सन गतप्राण झाल्याची खात्री करून घेतली. तत्क्षणी दुसरेही पिस्तूल काढले आणि स्वतःच्या डोक्याला लावले. मात्र, स्वतःलाही संपवण्याच्या प्रयत्नात गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या असलेल्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला. त्यामुळे कान्हेरे ब्रिटिशांच्या हातात पडले. मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली. वर्षभर खटला चालला. मात्र, गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले. अनंत कान्हेरे, विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशी दिली गेली. जॅक्सनचा वध करणारे कान्हेरे हे केवळ १९ वर्षांचे तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाले.
फोटो ( १४ अनंत कान्हेरे )
अनंत कान्हेरे यांना फाशी दिले जाण्यापूर्वी तुरुंगात काढण्यात आलेले त्यांचे छायाचित्र.