शिरवाडे वणी : मुंबई-आग्रा महामार्गावर जलसा हॉटेल समोर दोन मोटारसायकलच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे ते पिंपळगाव दरम्यान (एम एच १५ एफ एल ८७३९) मोटारसायकल वरून गणेश खैरनार (रा. सिडको) व बाळासाहेब चौरे (रा. पाथर्डी रोड, इंदिरानगर नाशिक) हे दोघे नाशिककडे जात होते. समोरून अचानक विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून (एम एच १५ एफ एस ५७०९) कांचन पवार (रा. पिंपळगाव बसवंत) हे येत असताना सोमवारी (दि. ३०) रात्री सव्वा सात वाजताच्या सुमारास समोरासमोर हा जोरदार अपघात घडला.
या अपघातात तिघेही मोटारसायकल स्वार अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर, हातापायांना जबर मार लागल्यामुळे तसेच रक्तस्राव झाल्यामुळे तिघांनाही बेशुद्धावस्थेत रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.