सटाणा : शहरात चोरी सत्र सुरूच असून, क्रांतिनगर भागात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सुमारे दोन लाख रु पयांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. वाढत्या चोऱ्यांमुळे शहरात घबराटीचे वातावरण आहे.शहरातील नामपूररोडवरील क्रांतिनगर भागातील रहिवासी कुंदन काकाजी खैरनार हे पोळ्यानिमित्त गावी गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडले. व घरात प्रवेश करून कपात तोडून कपाटात ठेवलेला अडीच तोळ्याचा सोन्याचा हार, एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे लॉकेट, एक तोळ्याचे कानातील ऐवजसह दहा हजारांची रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या योगेश बाळासाहेब भदाणे यांच्या घराकडे वळवला. भदाणे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील बावीस हजारांची रोकड व पाच हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास करून भगवान लक्ष्मण बर्डे यांच्या घर फोडले. घरातील सतरा हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदी ऐवजासह घड्याळ चोरून नेले. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरीमालेगाव : येथील गुलशनेराज सर्व्हे नं.११४ प्लॉट नं. ४४ मधील यंत्रभाग कारखान्यातून अज्ञात चोरट्याने ४६ हजार रुपयांचा माल घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद किल्ला पोलिसांत दाखल करण्यात आली. इमरान अख्तर मोहंमद सलीम (३४), रा. गुरुवेदनगर, बडा कब्रस्तानजवळ या यंत्रमागधारकाने फिर्याद दिली. त्याच्या मालकीच्या वरील यंत्रमाग कारखान्यामागील पत्र्याच्या शेडचा पत्रा कापून चोरट्याने आत प्रवेश केला व चोरट्याने ४६ हजारांचा माल चोरून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वराडे करीत आहेत.
चोरांच्या चर्चेने ग्रामस्थ चिंताग्रस्तदरेगाव : सध्या ग्रामीण भागात सर्वत्र चोरांच्या चर्चा झडताना दिसत आहेत. विशेषत: अनेक वस्त्या व शेतामध्ये तसेच गावातही चोरट्यांच्या भीतीपायी नागरिक रात्री आळीपाळीने जागे राहून सतर्क राहत असल्याचे दिसत आहे. दररोज चोरांच्या नवनव्या अफवांमुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त होताना दिसतात. व्हॉट्सअँपसारख्या सोशल मीडियावरून चोर्यांबाबत अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
सततच्या दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागात सध्या चोरट्यांसंदर्भातील अफवांमुळे भीतीचे वातावरण आहे. सातच्या आत घरात पोहचतानाही धाकधूक होत असल्याने रात्री होत असलेल्या चोर्यांबाबत चर्चा होत असते. ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकरी, महिलावर्गात सर्वत्र चोर्यांसंदर्भात चर्चा होताना दिसते.
ग्रामीण भागातील रस्ते रात्रीचे ओस पडू लागले आहेत व व्हॉट्सअँपवर इकडे चोर आले, तिकडे चोर आले अशा अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीसाठी ग्रामरक्षक दल कार्यान्वित करण्यात आले आहे