कळवण : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने कळवण तालुक्यातील कनाशी गटातील जिरवाडे-कुमसाडी-वीरशेत-गोधीपाडा - गुजरात हद्द या ५.८५ किमी रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी २६ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिली.राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुधरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, या अंतर्गत कळवण तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जि. प. सदस्यांनी सातत्याने केलेल्या मागणीची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. सध्याच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील ३० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यातील जिरवाडे - कुमसाडी- वीरशेत-गोधीपाडा-गुजरात हद्द या ५.८५ किमी रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी २६ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर दळणवळणयुक्त रस्ता झाल्यानंतर देखभाल व दुरु स्तीसाठी १६ लाख रुपयांनादेखील शासनाने मान्यता दिली आहे. जिरवाडे-बापखेडा - धनोली-कुमसाडी-वीरशेत-चाफापाडा मांगलीदर-भेगू-बोळकीपाडा- गोधीपाडा- गुजरात हद्द या रस्त्यावरील गावांना फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिली आहे. (वार्ताहर)
रस्त्यासाठी सव्वा तीन कोटी मंजूर
By admin | Updated: December 26, 2016 01:50 IST