नाशिक : शहरात अनेक वाहनधारक एकदा वाहनाचा विमा संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्य:स्थितीत हजारो वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
सरकारने नवीन वाहनांसाठी पाच वर्षांचा विमा बंधनकारक केला आहे. त्यामुळे आता विमाधारक वाहनांची संख्या वाढत असली तरी जुन्या वाहनांच्या व्यवहारांमध्ये एका वर्षाचाच विमा काढून खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. अशा वाहनांचा एकदा विमा संपुष्टात आला की पुन्हा त्याचे नूतनीकरण करणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे बीएस सहा वाहनांपूर्वीच्याही अनेक वाहनांचे विमा कवच संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण झालेले नाही. यात सर्वाधिक प्रमाण ट्रॅक्टर आणि दुचाकीसारख्या वाहनांचे असून खासगी वापराच्या वाहनांचा विमा संपल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशी वाहने विनापरवाना चालत असल्याची माहिती अनपेक्षित अपघात झाल्यानंतरच समोर येते. अशा वाहनांविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा वाहनांचा अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाल्यानंतर वाहनाची कोणतीही भरपाई मिळत नाही. तसेच विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यासह मालकावरही कारवाई होते. अशा अपघातानंतरच वाहनचालक आणि वाहनमालकांना वाहनांचा विमा काढण्याची सद्बुद्धी सुचत असल्याचे दिसून येते.
इन्फो-
इन्शुरन्स नसल्याचे धोके -
वाहनाला विमा केवळ अपघातातील भरपाईसाठीच नव्हे, तर वाहनाच्या सुरक्षिततेसाठी विमा महत्त्वाचा आहे. वाहन चोरी होणे, वाहनाला आग लागणे, वाहनाचा अपघात होणे अशा घटनांमध्ये विमा असलेल्या वाहनांची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्याचप्रमाणे वाहन विम्याच्या प्रकारानुसार, अपघातातील जीवितहानीचीही नुकसानभरपाई मिळते. मात्र विमाच नसेल तर यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे विम्याशिवाय वाहन चाविणाऱ्या चालकावर आणि वाहनमालकावरही गुन्हा दाखल होऊन हे दोघेही कारवाईस पात्र ठरू शकतात.
कोट-
(प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया वापरावी )