पुण्याकडून साडेचार हजार भाविक दाखलनाशिकरोड : सिंहस्थ-कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली नाक्याजवळील मोह शिवार बाह्य बसस्थानकातून शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सिन्नरफाटा कृषी उपबाजार समिती आवारापर्यंत भाविकांना सोडण्यासाठी एसटी बसेसच्या १०० फेऱ्या झाल्या होत्या. जवळपास साडेचार हजार प्रवासी पुणे बाजूकडून रस्तामार्गे पर्वणीनिमित्त शहरात दाखल झाले आहेत.कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीनिमित्त शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली नाक्याजवळील मोह शिवारात बाह्य बसस्थानक व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावाहून शिर्डी, पुणे रस्तामार्गे येणाऱ्या भाविकांना मोह शिवारात वाहने लावण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथून भाविकांना एसटी बसेसने सिन्नरफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बसस्थानकापर्यंत सोडण्यात आले. सकाळपासून सायंकाळपर्यंत मोहगाव शिवार बाह्य बसस्थानकापासून सिन्नरफाटा बसस्थानकापर्यंत भाविकांना घेऊन एसटी बसेसच्या १०० फेऱ्या झाल्या होत्या. त्याद्वारे जवळपास साडेचार हजार भाविक पुणे बाजूकडून रस्तामार्गे शहरात दाखल झाले आहेत. सिन्नरफाटा बाजार समितीच्या आवारातील बसस्थानकाबाहेरून रिक्षाने प्रवासी शहरात येत होते. मात्र सायंकाळनंतर भाविकांना पायपीट करावी लागली. (प्रतिनिधी)
पुण्याकडून साडेचार हजार भाविक दाखल
By admin | Updated: August 28, 2015 23:00 IST