नाशिक : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांना पुन्हा स्वगृही घेण्यावरून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी हकालपट्टी केलेल्या आठपैकी पाच शिवसैनिकांनी माफीनामा सादर केल्यानंतर त्यांची पुन्हा पक्षात घरवापसी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांना पुन्हा स्वगृही घेण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील आजी-माजी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये असलेल्या कथित नाराजीवरून मार्च महिन्यात सिडकोत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित येऊन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पुतळा दहन प्रकरणातील संबंधित शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांवर प्रखर भाषेत टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी पुतळा दहन प्रकारात सहभागी असलेले माजी नगरसेवक विष्णू पवार, रमेश उघडे, सुभाष गायधनी, नाना पाटील, मंदाकिनी जाधव, शुभांगी नांदगावकर, राजेंद्र नानकर, प्रताप मटाले या आठ जणांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात करण्यात आल्याची घोषणा केली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनाही पक्ष शिस्तीविरोधात काम केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, बडगुजर यांनीही खुलासा केला होता तर हकालपट्टी झालेल्या शिवसैनिकांनीही माफीनामा दिला होता. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये शुक्रवारी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी हकालपट्टी झालेले विष्णू पवार, राजेंद्र नानकर, रमेश उघडे, शुभांगी नांदगावकर आणि मंदाकिनी जाधव यांना पुन्हा पक्षात घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.
‘त्या’ शिवसैनिकांची घरवापसी
By admin | Updated: July 30, 2016 00:31 IST