नाशिक : उन्हाळा आल्यानंतर पांथस्थांना पाणी देणे ही भूतदया असली तरी नाशिक शहरात मात्र उलट स्थिती असून, महापालिकेने उभारलेल्या सर्वच पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. धर्मदाय संस्थांनी उभारलेल्या पाणपोया चांगल्या असताना महापालिकेकडे भली मोठी यंत्रणा असूनही पाणपोयांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याने आता या पाणपोयाच निरुपयोगी ठरल्या आहेत.महापालिकेने शहरात गेल्या काही वर्षांत पाणपोया उभारलेल्या नाहीत. पहिल्या पंचवार्षिक म्हणजेच १९९२ ते १९९७ च्या कालावधीत शेवटी शेवटी अशाप्रकारे पाणीपोई उभारण्याची टुम निघाली आणि त्यातून मग सर्वत्र त्या उभारल्या गेल्या. पुढील काळात म्हणजेच १९९८-९९ दरम्यान, महापालिकेने राबविलेल्या ऐतिहासिक अतिक्रमण विरोधी मोहिमेत बहुतांशी पाणपोया हटविण्यात आल्या. त्यावेळी ज्या पाणापोयांवर जेसीबी चालला नाही, त्यादेखील कार्यरत ठेवणे महापालिकेला जमलेले नाही. परिणामी, बहुतांशी सर्वच पाणपोयांना पाणीपुरवठ्याची व्यवस्था असली तरी टाक्यांची अवस्था इतकी बिकट आहे की त्यात पाणी साठवले जात नाही आणि साठवलेच तर अस्वच्छतेमुळे पाणी पिणारे आजारी पडतील, अशी अवस्था आहे. त्यामुळे अशा पाणपोयांची अवस्था सुधरावावी अथवा त्या तोडून टाकाव्यात, अशीदेखील मागणी होऊ लागली आहे.
तहानलेल्या पाणपोया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:26 IST