नाशिकरोड : मुंबई, ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रविवारीदेखील मुंबईकडे जाणाऱ्या एकूण १३ गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या गाड्यांचा समावेश आहे.नाशिककरांसाठी मुंबईला जाणारी महत्त्वाची समजली जाणारी पंचवटी एक्स्प्रेस सलग तिसऱ्या दिवशी रद्द झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले, तर अनेक नोकरदार मुंबईत अडकून पडले आहेत. पंचवटीबरोबरच राज्यराणी आणि गोदावरी या रेल्वेगाड्यादेखील रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुंबई-औरंगाबाद तपोवन एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मुंबईहून रविवारी सुटणारी व उत्तर प्रदेश, पंजाबमधून येणाऱ्या गोरखपूर- एलटीटी गोदान एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, साकेत एक्स्प्रेस, वाराणसी, लखनौ, गोरखपूर, कृषिनगर, अमृतसर, पठाणकोट, कामायनी एक्स्प्रेस या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.मुंबईहून सुटणाऱ्या व नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या सुमारे चार ते सहा तास उशिराने धावत होत्या. दरम्यान, इटारसी येथे झालेला तांत्रिक बिघाड दरुस्त करण्यात आल्यामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व रेल्वेमार्गावर पडलेला ताण काही प्रमाणात कमी झाल्याने तेथील वेळापत्रकही सुरळीत होत आहे. (प्रतिनिधी)
सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द
By admin | Updated: June 21, 2015 23:54 IST