नाशिक : माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या ३ आॅक्टोबरच्या मूक मोर्चात राज्यातूनच नव्हे, तर विविध राज्यांतून सुमारे दहा लाख भुजबळ समर्थक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.भुजबळ परिवाराकडून चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जात असताना छगन भुजबळांना चौकशीच्या नावाखाली बोलावून अंधारात ठेवून अटक केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे भुजबळ कुटुंबीयांकडून तपासात संपूर्ण सहकार्य केले जात आहे. खासदार किरीट सोमय्या यांच्या बोलण्यानुसार सरकार कारवाई करीत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांबाबत शंका घेण्यास वाव आहे. भुजबळांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. चौकशीचा अतिरेक केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भुजबळ यांच्या जामिनासाठी न्यायालयीन कामकाज सुरू आहे. प्रत्येक तारखेवेळी कोणत्या ना कोणत्या यंत्रणेककडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची चौकशी पुढे करून त्यांना जामीन मिळू दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपविण्यासाठी त्यांची प्रतिमा मलीन केली जात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा संपूर्ण विश्वास असून, न्यायव्यवस्थेकडून आम्हाला न्याय मिळेल, असे भुजबळ समर्थकांचे म्हणणे आहे. भुजबळ समर्थकांमध्ये असंतोष असून, या असंतोषातून ३ आॅक्टोबरला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, जी. जी. चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजीराव तिडके, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, मीर मुख्तार, छबू नागरे, लक्ष्मण धोत्रे, वामनराव गायकवाड, भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते दीपचंद दोंदे, महापालिका विरोधी पक्षनेते कविता कर्डक, अमोल निकम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भुजबळ समर्थनार्थ मूक मोर्चात दहा लाख समर्थक येणार
By admin | Updated: September 30, 2016 01:51 IST