नाशिक : देशी बनावटीचे पिस्तूल असो की, गावठी कट्टे विनापरवाना बाळगण्याची ‘क्रेझ’ शहरात अलीकडे वाढीस लागत असल्याने पोलिसांनी अचानकपणे याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आतापर्यंत शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या धडक कारवाईमध्ये १२ गावठी कट्टे, ११ पिस्तुली आणि ५० काडतुसे जप्त केली आहेत. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२ गुन्हे या दोन कारवायांमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरात चालू वर्षी अवैधरीत्या अग्निशस्त्रांसह कोयते, तलवारी, चॉपरसारखे घातक शस्त्रे विनापरवाना बाळगणे, तसेच काडतुसांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून संबंधितांना पुरवठा केला जात असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये घातक धारदार शस्त्रे जप्त करण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे. शहरात अवैधरीत्या अग्निशस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेश राज्यातील विविध शहरांमधून तर तलवारींचा पुरवठा राजस्थानमधून होत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मध्य प्रदेश, गुजरात या दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागून असल्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारांकडून तस्करी वाढू लागली आहे. सराईत गुन्हेगारांना अत्यंत कमीतकमी किमतीत ही शस्त्रे उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर वाढत चालला आहे. गुन्हेगारांमधील आपापसात वादात वा सर्वसामान्यांमध्ये धाक निर्माण करत लूट करण्यासाठी शस्त्रांचा वापर होऊ लागल्याचे विविध घटनांमधून दिसून आले आहे. नाशकात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गावठी कट्टे, पिस्तुली, काडतुसांचा अवैध व्यापाराची पाळेमुळे घट्ट होऊ पाहत असून, शहर व जिल्हा पोलिसांपुढे नव्या वर्षात ही पाळेमुळे उखडून फेकण्याचे आव्हान राहणार आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे पाण्डेय यांच्या ‘टार्गेट’वरपोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अवैधरीत्या शस्त्रे स्वत:जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची मोहीम उघडल्यामुळे गुन्हेगारांमध्ये काहीसा वचक निर्माण झाला आहे. आतापर्यंत त्यांच्या आदेशान्वये शहरात सुमारे तीनदा अशी धडक मोहीम राबविली गेली आहे. यामुळे यंदा अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२, तर धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी तब्बल ८७ गुन्हे दाखल झालेत आणि तेवढेच शस्त्रे जप्त करण्यात आली.
हत्यारे बाळगण्याचे प्रमाण तिप्पटमागील वर्षभरात शहर पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये गावठी कट्टे आणि पिस्तुली ळगल्याप्रकरणी २१ /गुन्हे दाखल करण्यात आले होते. चालू वर्षभरात मात्र पोलिसांनी धारदार कोयते, चाकू, तलवारी अशी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २३ /गुन्हे दाखल दाखल केले. या वर्षी अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जास्त गुन्हे दाखल झाले होते.