या संदर्भात मंगळवारी (दि.३१) शहरातील निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक महात्मा गांधी रोडवर घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या विस्तारात नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याच्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यात प्रामुख्याने जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे, शोभा बच्छाव, हेमलता पाटील, राहुल दिवेवगळता अन्य व्यक्तींच्या समावेशाला विरोध दर्शविण्यात आला. प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लावताना शहर व जिल्हा कार्यकारिणीचा ठराव करावा लागतो, तसेच एकमताने नावे पाठविण्यात येतात, परंतु विस्तारित कार्यकारिणी जाहीर करतांना कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही. ज्यांना गाव, तालुक्यात ओळखले जात नाही, अशांना प्रदेशची पदे खिरापतीसारखे वाटण्यात आल्याबद्दल, अशा कार्यकारिणीचे स्वागत करण्याऐवजी निषेधाचा ठराव करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा विचार करता, विस्तारित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा या निवडणुकीत कितपत फायदा होईल, असा सवाल करून या कार्यकारिणीला प्रदेश कार्यकारिणीने तत्काळ स्थगिती द्यावी व खऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना त्यात न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार असून, संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कानावरही ही बाब घालण्याचे ठरविण्यात आले. या उपरही न्याय न मिळाल्यास दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला. या बैठकीस काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, विजय राऊत, सुरेश मारू, रईस शेख, वसंत ठाकुर, भारत टाकेकर, हनिफ बशीर, ज्ञानेश्वर काळे, स्वप्निल पाटील, बबलू खैरे, दिनेश निकाळे, विजय पाटील, उद्धव पवार, कैलास कडलग, लक्ष्मण धोत्रे, संदीप शर्मा, भरत पाटील आदी उपस्थित होते.
चौकट====
यांना आहे विरोध
ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळ, सुमित्रा बहिरम, भास्कर गुंजाळ, अनिल पाटील, यशवंत गवळी यांच्या नावाला विशेष करून कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. यातील अनेकांना गावातही कोणी ओळखत नसल्याचे, तसेच यांचे पक्षासाठी योगदान काय, असा सवालही केला जात आहे.