नाशिक : तिच्या मनातली विठ्ठलाबद्दलची अढी... भुकेल्या पोरांची खपाटीला गेलेली पोटे भरण्याची चिंता... तुकोबांच्या भक्तीचा महिमा अनुभवल्यानंतर झालेला अचंबा असे सारे भाव नाट्यपदांतून व्यक्त झाले आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अवघे रसिक भक्तिरसात चिंब झाले...निमित्त होते ‘अथांग आवली’ या कार्यक्रमाचे. राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे द्वितीय व अन्य पारितोषिके पटकावणाऱ्या ‘संगीत तुक्याची आवली’ या नाटकातील निवडक संवादांचे अभिवाचन व संबंधित नाट्यपदांचे गायन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. शंकराचार्य संकुलात रंगलेल्या या कार्यक्रमात जशी दूर गगनातली, एक होती आवली, फिरे जात्याचा पवाळ, आई मंगलाई माय, सुखासने का विस्कटली, दाटली कुठेशी किरणे... आदि पदांचे गायन करण्यात आले. तुकोबांच्या घरी धान्याची पोती भरून आल्यानंतरचे ‘मीच तू, तुझ्यातच मी हो...’ या पदासह अन्य सर्वच पदांना रसिकांनी मनापासून दाद दिली. ‘व्याधिवत अवसान गळाले’ या पदानंतर ‘टाळ-चिपळ्या सोडून गेला’ या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाची संकल्पना दीपक मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी यांची होती. सई आपटे, आनंद अत्रे, संदीप थाटसिंगार, अबोली पंचाक्षरी यांनी गायन केले. सतीश पेंडसे यांनी तबल्याची साथ केली. गिरीश जुन्नरे, शौनक गायधनी व केतकी कुलकर्णी यांनी नाटकातील संवादांचे अभिवाचन केले. नाट्यपदांचे लेखन सी. एल. कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एक होती आवली...
By admin | Updated: July 27, 2015 01:01 IST