लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कर्जमुक्तींसाठी संपावर उतरला असल्याने संप मोडून निघाला तर भविष्यात त्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार गुरुवारी राज्यव्यापी शेतकरी परिषदेत करण्यात आला. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील, कॉ. अजित नवले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या परिषदेत सर्वांनीच सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सरकार सत्तेवर आल्यास स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तसेच शेतमालाच्या उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे झाले, परंतु यातील एकाही आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, सरकारची नियत साफ नसल्याने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांना सत्ता दिली, तिच सत्ता पुन्हा खेचून आणण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये असल्याचा इशाराही देण्यात आला. ३२ लाख कोटींचा आकडा कोठून काढला - जयंत पाटीलअल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३२ लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आकडा कोठून व कसा काढला याचा उलगडा झाला पाहिजे. अशा प्रकारची आकडेफेक करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत नवीन ते काय? देशातील भांडवलदारांचे १६ लाख कोटीचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. या १६ लाख कोटींपैकी एकट्या रिलायन्सचे चार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तर शिक्षा भोगण्यास तयार - रघुनाथदादा पाटीलराज्य सरकारने ११ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकी गोठविण्याचे परिपत्रक काढले होते, त्याची अंमलबजावणी करावी व सुकाणू समिती ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत शिफारशी करेल त्याची पूर्तता केल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी आपण देण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यावरही जर राज्यात शेतकरी आत्महत्या झाली तर आपण मुख्यमंत्री सांगतील ती शिक्षा भोगण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आंदोलन कोणतेही असो ते सरकारच्या विरोधातच असते, अशा आंदोलनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास लावून मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन केली आहे. गद्दारांची संगत नाही - शेट्टीतीन वर्षांपूर्वी भाजपाला मते द्या म्हणून मीच फिरलो, परंतु आज मला त्याचा पश्चात्ताप होत आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून एकवटला असताना सरकारने आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या या प्रयत्नात आमच्यातील एक गद्दारही निघाला. अशा गद्दाराविषयी मला शरम वाटते, परंतु गद्दारांच्या अवलादीची संगत फार काळ ठेवणार नाही. कर्जमुक्ती मिळावी यासाठी ज्याची मदत मिळेल ती घेऊ व प्रसंगी सैतानांना बरोबर घेण्यात येईल, मात्र कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे आंदोलनकर्त्यांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी अगोदर माझी कुंडली काढावी, मी घाबरत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास ‘वाईट दिवस’ जवळ आले याची जाणीवही ठेवण्यात यावी.
कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय माघार नाही!
By admin | Updated: June 9, 2017 01:22 IST