सटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यात ‘त्या’ सोळा विंधनविहिरी करताना पालिका प्रशासनाकडून कोणतीही परवानगी अथवा मंजुरी न घेतल्याने त्याची दप्तरी नोंद नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिल्याने खळबळ उडाली आहे. माहितीचा अधिकार वापरून ही माहिती उघड झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार निधीमधून झालेल्या या कामाचे बिल अदा करू नये, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे यांनी केली आहे.गेल्या जून महिन्यात आमदारांच्या स्थानिक निधीमधून शहरातील विविध भागात सोळा विंधनविहिरी खोदून शहराची पाणीटंचाई दूर केल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख शरद शेवाळे यांच्यासह शिवसैनिकांनी विंधनविहिरींचे मोजमाप करून स्टिंग आॅपरेशन करून लोकप्रतिनिधींनी केलेला दावा फोल ठरवला होता. या स्टिंगमध्ये सोळापैकी तब्बल तेरा विंधनविहिरींत अक्षरश: फुपाटा निघाला, तर अन्य विहिरींचा शोधच लागला नसल्याचे उघडीस आले. या शिवसेनेच्या स्टिंगचे पडसाद थेट पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटून मोठा गदारोळ झाला होता. यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी विंधनविहिरीसंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे यांनी पालिकेकडे माहितीचा अधिकार वापरून आमदार निधीमधून शहरात किती विंधनविहिरी केल्या, त्याला पालिका सभागृहाची मंजुरी घेतली का, तसेच भूजल सर्वेक्षण विभागाचा दाखला घेतला आहे , अशी माहिती पालिकेकडे मागितली होती. मात्र पालिकेने यासंदर्भात पालिकेच्या दप्तरी कुठलीही नोंद नसल्याचे उत्तर माहिती अधिकार कार्यकर्ता सोनवणे यांना दिली आहे. (वार्ताहर)
सटाण्यातील ‘त्या’ सोळा विंधनविहिरींची नोंदच नाही
By admin | Updated: August 2, 2016 01:18 IST