नाशिक : घंटागाडी ठेकेदारांकडून करारनाम्यानुसार अटी-शर्तींचे पालन होताना दिसून येत नाही. ठेकेदारांनी अटी-शर्तींचा भंग केल्यास त्यांच्याकडून वसूल होणारा माफ केला जाणार नाही, याउलट न्यायालयात जाऊन पाच वर्षांचा करारनामा रद्द करण्याचा इशारा स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत ठेकेदारांना दिला.स्थायी समितीच्या बैठकीत सेनेचे प्रवीण तिदमे यांनी सिडको परिसरात घंटागाड्या वेळेवर येत नसल्याची तक्रार करतानाच आरोग्य विभागाकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला. त्यावर सभापती गांगुर्डे यांनी त्याची गंभीर दखल घेत सदस्यांना मागितल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश आरोग्य विभागाला केले. बैठकीत सावरकर जलतरण तलावाच्या विविध दुरुस्त्यांसाठी ५० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय चर्चेला आला असता, सभापतींनी ३३ टक्के कमी दराची निविदा आल्याने शंका उपस्थित करत दर्जेदार काम करून घेण्याचे आदेशित केले. सूर्यकांत लवटे यांनी नाशिकरोड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. सदर तरण तलावावर सुरक्षा रक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा त्याठिकाणी तयार होत असल्याची गंभीर तक्रार त्यांनी केली. सभापतींनी नाशिकरोडच्या तरण तलावाबाबतही जातीने लक्ष घालण्याची सूचना संबंधित विभागाला केली. दरम्यान, जादा विषयात प्राप्त झालेल्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नियुक्तीस स्थायीने मान्यता दिली.
घंटागाडी ठेकेदारांना दंडमाफी नाही
By admin | Updated: May 22, 2017 17:38 IST