नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या हद्दीतील चिंचलेखैरे या अतिदुर्गम व डोंगराळ परिसरात एका झोपडीवजा झापात राहणाऱ्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेला बिबट्याने ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. झापाचा दरवाजा उघडा राहिल्याने बिबट्याने डाव साधला. दरम्यान, रविवारी (दि. १३) सकाळी घरापासून अर्धा कि.मी. अंतरावर या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला.
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा वावर असलेल्या मार्गाचा अंदाज घेत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.
श्रीमती शकुंतला अमृता रेरे असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावापासून जवळच असलेल्या झोपडीवजा झापात ही महिला आपल्या शेळ्यांसह राहत होती. रात्रीच्या सुमारास सावज शोधण्यासाठी वावरत असलेल्या बिबट्याला शेळ्यांची चाहूल लागल्याने बिबट्या या झापाकडे आला असावा व त्याच स्थितीत बिबट्याने झोपेत असलेल्या वृद्ध महिलेला फरफटत ओढत नेऊन तिचा बळी घेतला. वन विभागाला याबाबतची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा माग घेतला. वन विभागाच्या नियमानुसार या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.
इन्फो
दीड वर्षापूर्वीही महिलेचा बळी
दीड वर्षापूर्वीही ८ ऑगस्ट २०२० रोजी चिंचलेखैरे या वाडीतीलच याच परिसरातून रात्रीच्या वेळेसच श्रीमती भोराबाई महादू आगीवले या वृद्ध महिलेलाही बिबट्याने घरातूनच जंगलात फरफटत ओढत नेऊन तिचा बळी घेतला होता. दुर्गम डोंगराळ भाग व जंगल परिसर असल्याने या भागातही नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असते.