नाशिक : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंचा आकृतिबंध अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले असून, याच आठवड्यात पदवीधर ग्रंथपालाच्या बीएड समकक्ष वेतनश्रेणीचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्त एकदिवसीय उपोषण केले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागोजी गाणार यांच्यासह अन्य प्रतिनिधींना बोलवून घेतले आणि चर्चा केली. या चर्चेत ठरल्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध तयार असून, तो अधिवेशन संपण्याच्या आत घोषित केला जाणार आहे, तसेच पूर्णवेळ पदवीधर ग्रंथपालांना बीएड समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश तसेच अवमान याचिकांवर झालेल्या निर्णयाबाबत विसंगत माहिती मिळाल्याचे तावडे यांनी सांगितले. त्यांना न्यायालयाचे सर्व आदेश दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याला पुरेशी माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे याच आठवड्यात म्हणजेच २५ मार्चच्या आत सर्व अधिकाऱ्यांना समवेत संबंधित शिक्षक परिषद प्रतिनिधींची बैठक बोलवून बीएड समकक्ष वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.या प्रतिनिधी मंडळात भगवानराव साळुंखे, अनिल बोरनारे, रमेश चांदोरकर, नितीन कुलकर्णी, तसेच शिक्षकेतर महामंडळाचे शिवाजी खांडेकर, ग्रंथपाल विभागाचे प्रमुख विलास सोनार, विनोद भंगाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकेतरांचा आकृतिबंध आठवडाभरात
By admin | Updated: March 20, 2017 01:20 IST