नाशिक : शासनाच्या समान टीडीआर धोरणानुसार सहा व साडेसात मीटर रस्त्यावरील बांधकामांसाठी टीडीआर प्रस्तावित नसल्याने नऊ मीटरखालील रस्त्यांवरील बांधकामांना नियम २१० अंतर्गत टीडीआरसह अनेक फायदे देण्याचा प्रस्ताव महापालिकेने जागामालकांसह विकासकापुढे ठेवूनही अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. नियम २१० बाबत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाऊण मीटर ते दीड मीटर जागा सोडण्याविषयीच्या प्रस्तावाबाबत अद्यापही जागामालकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपासून एकही प्रस्ताव नगररचना विभागाकडे प्राप्त होऊ शकलेला नाही. राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०१५ रोजी संपूर्ण राज्याकरिता समान टीडीआर धोरणाचा अध्यादेश काढला आहे. शासनाच्या या समान टीडीआर धोरणानुसार सहा व साडेसात मीटर रस्त्यावर टीडीआर प्रस्तावित नसल्याने अनेक रस्त्यांवर इमारत बांधकाम करताना अडचण येणार आहे. त्यासंदर्भात नियम २१० अंतर्गत सहा मीटर रस्त्यावर दोन्ही बाजूने दीड मीटर व साडेसात मीटर रस्त्यावर दोन्ही बाजूने पाऊण मीटर रस्ता शासनाकडे स्वेच्छेने व कालबद्ध अधिग्रहित केल्यास रस्त्याची किमान रुंदी नऊ मीटर होणार असल्याने अशा रस्त्यांवरील भूखंडांना टीडीआरसह अनेक फायदे मिळू शकतील. यावर बीपीएमसी अॅक्टनुसार अंमलबजावणी करता येऊ शकते, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. महिनाभरापूर्वी आयुक्त व नगरररचनाच्या सहसंचालक यांच्यासमवेत शहरातील बांधकाम व्यवसायाशी संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. त्यावेळी आयुक्तांनी ९ मीटरवरील रस्त्यांवरील बांधकामांना तत्काळ परवानगी देण्याचा निर्णय जाहीर करतानाच नियम २१० अंतर्गत नऊ मीटरखालील रस्त्यांवरील बांधकामांबाबतही प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, संबंधित जागामालकांसह विकासकांना केलेल्या बांधकामांचे नकाशे सादर करत त्याबाबत हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. परंतु, अद्याप या प्रस्तावाला एकानेही प्रस्ताव दिलेला नाही. सदर प्रस्तावातील त्रुटींबाबत नगररचना विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीपोटी विकासकांकडून प्रस्ताव दाखल केले जात नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
नऊ मीटर रस्त्यांवरील बांधकाम प्रस्तावाकडे पाठ
By admin | Updated: April 27, 2017 01:47 IST