सिडको : येथील औदुंबर स्टॉपजवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळेचे अतिक्रमण सिडको प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने काढल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जुन्या व्यायामशाळेवर जेसीबी चालविण्यात आल्याने सिडको प्रशासनावर कारवाई करावी, याबाबत शिवसेनेच्या वतीने अंबड पोलिसांना निवेदन देण्यात आले.राणाप्रताप चौक येथील औदुंबर स्टॉप जवळ सिडकोच्या जागेवर गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळा आहे. सिडको प्रशासनाने सोमवारी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने सदर व्यायामशाळा पाडल्याने शिवसैनिक व व्यायामप्रेमींनी गर्दी करीत प्रशासनाचा निषेध केला. तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या वतीने व्यायामशाळेचे अतिक्रमण काढत असताना शिवसेनेचे संदीप पाटील यांनी सर्वप्रथम यास विरोध दर्शविल्याने सिडको प्रशासनालाही अर्धवट काम सोडून माघारी फिरावे लागले. सिडको प्रशासनाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील भूखडांवर असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली असून याच मोहिमेच्या अंतर्गत व्यायामशाळेचे अतिक्रमण काढल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, व्यायामशाळेचे अतिक्रमण काढत असल्याने शिवसेनेने विरोध दर्शवित अंबड पोलीस ठाण्यात सिडको प्रशासन व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, याबाबत पोलीस निरीक्षक एस. आर. बंबाले यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रवीण तिदमे, उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, शिवसेना समन्वयक सचिन राणे, माजी नगरसेवक मामा ठाकरे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, संदीप पाटील, मयूर परदेशी, नाना पाटील, शैलेश साळुंखे, आकाश शिंदे, प्रमोद महाले, मुकेश भिंगारे, नीलेश हाके, नाना पवार, सुयश पाटील, सागर पवार, वैभव राऊत, सनी साबळे, प्रसाद कु लकर्णी, शुभम थोरात, बापू कदम, स्वप्नील कळमकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
सिडकोत अतिक्रमण काढल्याने तणाव
By admin | Updated: July 26, 2016 00:17 IST