नाशिक : मीटरवरील आकडे आणि वाढीव वीजदर याबाबत ग्राहकांमध्ये मेाठ्या प्रमाणावर शंका असताना दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीमही सुरू झाल्याने ग्राहकांची धावपळ वाढली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आलेला आहे. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात १० हजार २६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, या ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना एकूण थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी भुर्दंड सोसावा लागणार आहे. नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ८१ हजार ग्राहकांकडे ६७ कोटी ३२ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ३७ हजार ग्राहकांकडे १९ कोटी ५६ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील २ हजार ८९० ग्राहकांकडे ६ कोटी ३६ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ७१७ ग्राहकांकडे १७० कोटी ४२ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ३६ ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख थकबाकी आहे. नाशिक परिमंडलात एकूण ७ लाख २९ हजार ग्राहकांकडे ८५५ कोटी ४० लाख रुपये थकबाकी आहे.
महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेतून महावितरणच्या थकबाकी वसुलीमध्ये वाढ होत असली तरी ग्राहकांमधील शंकांचे समाधान मात्र होत नसल्याचेही बोलले जात आहे. वाढीव वीज बिलाचे गणित महावितरणकडून मांडले जात असताना अचानक वाढलेल्या वीज बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होताना दिसत नाही. वीज बिलाच्या दरात वाढ झाल्याची माहिती असंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नाही. याशिवाय दंडात्मक रकमेबाबतची नाराजीदेखील आहे. नेमकी याबाबतच स्पष्टता नसल्याने माहिती ग्राहकांच्या पचनी पडत नसल्याचे एकूणच चित्र आहे.
--इन्फो--
वीज बिल भरण्यासंदर्भात येणाऱ्या भ्रमणध्वनीवरून केवळ दोन तास वीज बिल भरण्याची मुदत दिली जाते. दुपारी दोन वजल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्याचे सांगितले जाते. विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबतची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहे. त्यातून त्यांचे समाधान करण्याऐवजी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मंडळ पातळीवरील कर्मचाऱ्यांकडून थेट कारवाईची भाषा केली जात असल्याने अनेकांना बिल भरण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नसल्याची तक्रार आहे.