लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत तर किमान तापमान १७ अंशांपर्यंत गेलेले असताना बुधवारी सायंकाळनंतर किमान तापमानात अचानक घट होऊन गारठा वाढला होता. वातावरणात शीतलहरींचा वेग वाढल्याने रात्रभर तसेच गुरुवारी पहाटेही थंडीचा कडाका अनुभवयास आला. शहरात १० अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये ४.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. एका दिवसात दोन्हीकडे सहा ते सात अंशांची तापमानात घट झाली. वाढत्या उकाड्याने हैराण झालेले नाशिककर अचानकपणे गारठले. हवामानात अचानकपणे होणारा बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे.
शहराचे वातावरण पंधरवड्यापासून ‘हॉट’ असताना बुधवारी सायंकाळपासून वातावरणात थंडीची तीव्रता वाढली.
आधी झळा; नंतर गारठा
बुधवारी दिवसभर नागरिकांनी उन्हाच्या झळांची तीव्रता अनुभवली. कमाल तापमानात दोन अंशांनी घसरण होऊन ३३ अंशांपर्यंत पारा खाली आला; मात्र किमान तापमानाचा पारा वेगाने खाली घसरला. यामुळे सायंकाळी हवेत गारठा निर्माण झाला होता. पहाटे नागरिकांना फेरफटका लगावण्यासाठी बाहेर पडताना अक्षरक्ष: उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागल्याचे चित्र दिसले.
उत्तर भारतातून राज्याकडे थंडी घेऊन येणारे वारे नाशिकसह संपूर्ण विदर्भ व राज्यातील २३जिल्ह्यांत धडकत आहेत. यामुळे एकाएकी थंडीत वाढ झाली. दीड महिन्यांपासून बंगालच्या उपसागरात पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा एकसुरी वहनामुळे राज्याकडे झेपावणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होत होता. थंडीच्या लाटेची ही स्थिती येत्या शनिवारपर्यंत (दि.८) राहण्याची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, हवामान अभ्यासक