नितीन बोरसे
बागलाणबागलाण तालुक्यातील लखमापूर येथे पंधरा दिवसांपूर्वी आठ लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध सटाणा पोलिसांनी चक्क अमलात नसलेल्या कायद्यांतर्गत कारवाई केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत सटाणा न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत योग्य कलम लावण्याचे आदेश पोलिसांना दिले. अन्न व औषध प्रशासनामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे कारण दाखवणाऱ्या पोलिसांनी या कारवाईबाबत तब्बल दहा दिवसांनी पत्र दिल्याचे सटाणा पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आर.एफ. कोली यांनी गुटख्याच्या कारवाईबाबत सटाणा पोलिसांनी दहा दिवसांनी पत्र दिल्याचा खुलासा केला आहे. त्यातच ५ आॅगस्ट २०११ रोजी रद्द झालेला मात्र भेसळ प्रतिबंधक कायदा १९५६ हा अमलात नसताना त्याअंतर्गत कारवाई केल्याने सटाणा कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढत अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमन २०११ या कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब, अन्न व औषध प्रशासनावरची टोलवाटोलवी, अमलात नसलेल्या कायद्यांतर्गत केलेली कारवाई आणि कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाला दहा दिवस उशिराने दिलेले पत्र घेत हा सर्व प्रकार पाहता पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)