नाशिक : देशभक्त शेषराव घाटगे यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांमधून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. त्यातील अनेक प्रसंग समाजाला मूल्यांची शिकवण देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी ‘देशभक्त शेषराव घाटगे’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना केले.आय.एम.ए. सभागृहात सारांश प्रकाशनच्या वतीने आयोजित समारंभात प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे लिखित ‘देशभक्त शेषराव घाटगे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन गांगल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी दिनकर गांगल यांनी सांगितले, नेरपिंगळाई, अमरावती येथील देशभक्त शेषराव घाटगे यांची पत्रे त्यांच्या वारसांनी जपून ठेवली म्हणून एक चांगला ठेवा लोकांसमोर येऊ शकला. शेषरावांच्या पत्रातील भाषा ही गडकऱ्यांसारखीच आहे. शेषरावांची पत्रे सुसंस्कार देणारी असून, त्यांनी त्यातून समाजाचा बारकाव्याने केलेला अभ्यासही प्रतीत होतो. उशिराने का होईना त्यांच्या विचारांचा खजिना बोऱ्हाडे व घाटगे कुटुंबीयाने उपलब्ध करून दिला. त्यामुळे समाजाची वैचारिक जडणघडणच होणार असल्याचे गांगल यांनी सांगितले. यावेळी लेखक प्रा. शंकर बोऱ्हाडे, प्रा. गो. तु. पाटील व डॉ. विजय घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीमती नीलिमा पवार यांनीही चरित्रग्रंथामुळे समाजाला मोठा वैचारिक खजिना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घाटगे यांनी आभार मानले. व्यासपीठावर नेरपिंगळाई येथील डॉ. मोतीलाल राठी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, कामगार नेते दत्ता निकम, श्रीकांत घाटगे आदि, तर सभागृहात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जयप्रकाश जातेगावकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, मिलिंद मुरुगकर, प्राचार्य दिलीप धोंडगे, प्राचार्य दिलीप शिंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घाटगे यांच्या चरित्रातून मूल्यांची शिकवण
By admin | Updated: November 24, 2014 00:23 IST