Teacher transfers proceedings week! | शिक्षक बदल्यांची कार्यवाही आठवड्यात !
शिक्षक बदल्यांची कार्यवाही आठवड्यात !

ठळक मुद्देपोर्टल बंद : पत्नीच्या दुर्धर आजाराचा शिक्षक पतीलाही लाभ

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढवून दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळनंतर पोर्टल बंद करण्यात आले असून, बदलीपात्र शिक्षकांची माहिती राज्यस्तरावर प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच येत्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यंदा शासनाने दुर्धर आजारी असलेल्या पत्नीबरोबरच पतीचीही सोयीनुसार बदली करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक पतीला मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची माहिती व रिक्त पदांची माहिती संगणकात भरण्याचे काम शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यभर हाती घेण्यात आले होते. या माहितीत प्रामुख्याने शिक्षकाने आजवर बजावलेली सेवा, आदिवासी, बिगर आदिवासी, अवघड क्षेत्रात केलेली नोकरी याचा समावेश होता. गेल्या आठवड्यात या संदर्भातील संपूर्ण राज्यातील माहिती भरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ६ ते १० जून या कालावधीत शिक्षकांना बदल्यांसाठी संगणकीय अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली. त्यानुसार सोमवारी ही मुदत संपलेली असली तरी, ९ जून रोजी शासकीय सुटी आल्यामुळे सरकारने शिक्षकांच्या मागणीचा विचार करून मंगळवार (दि. ११) सायंकाळी पाच वाजेपर्यंत माहिती भरण्याची मुभा दिली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळनंतर शासनाचे पोर्टल बंद करण्यात आले.
दुर्धर आजारी, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांचा समावेश असेल. विशेष संवर्गात दुर्धर आजारी असलेल्या शिक्षक पत्नीच्या बदलीला प्राधान्य देतानाच पतीलादेखील तिच्या सोबतच बदली देण्याची यंदा नव्याने तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रितीकरणाच्या बदल्या करण्यात येणार असून, तिसºया टप्प्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातील.
तिन्ही टप्प्यात बदली न झालेले विस्थापित तसेच रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी चौथा व पाचवा टप्पा राबविण्यात येणार आहे. या टप्प्यातील बदल्या मात्र स्थानिक पातळीवर रिक्त असलेल्या जागा व बदली पात्र शिक्षकांची संख्या पाहून आॅफलाइन करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा १७ जूनपासून सुरू होणार असून, तत्पूर्वीच बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता शिक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या टप्प्यात विशेष संवर्गातील बदल्या
सर्व माहिती राज्य सरकारच्या सर्व्हरमध्ये जमा झाल्याने त्याची आता खातरजमा करण्यात येणार असून, भरलेली माहिती योग्य व बिनचूक असल्याचे लक्षात येताच, शासन पातळीवरच या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने विशेष संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात केल्या जातील.


Web Title: Teacher transfers proceedings week!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.