पंचवटी : प्रभागातील अनेक विभागांत गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने सध्या स्वखर्चातूनच टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे टॅँकर आहेत; मात्र टॅँकरवर चालक नसल्याने भले आम्ही आमचे मानधन देतो पण तुम्ही टॅँकरवर चालक द्या, अशी मागणी खुद्द लोकप्रतिनिधींनी पंचवटी प्रभागाच्या बैठकीत करून पाणीपुरवठ्याच्या कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंचवटी प्रभागाची सभा सभापती सुनीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या सभेत पाच विषयांच्या सतरा लाख रुपयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. प्रभागात पिण्याचे पाणी येत नसल्याने स्वत:च्या खिशातूनच टॅँकरचा खर्च करावा लागत असल्याची खंत व्यक्त करत प्रशासनाने पाणी पट्टीत सवलत द्यावी अशी मागणी नगरसेवक गणेश चव्हाण, रंजना भानसी यांनी केली. तर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे चालक नसल्याने प्रशासनाने आमचे चार महिन्याचे मानधन घ्या पण टॅँकरवर चालक द्या, अशी मागणी नगरसेवक समाधान जाधव, उद्धव निमसे यांनी करून तसा प्रशासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले. मनपाकडे निधी नसल्याने आता लोकवर्गणीतून साहित्य खरेदी करायचे का, असा सवाल खुद्द सभापती शिंदे यांनीच अधिकाऱ्यांना केला. यावेळी झालेल्या बैठकीत शालिनी पवार, रूपाली गावंड, फुलावती बोडके, विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, सी. बी. अहेर, आर. एस. पाटील, आर. एम. शिंदे, राहुल खांदवे, संजय गोसावी आदिंसह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
आमचे ‘मानधन’ घ्या पण टॅँकरवर चालक द्या
By admin | Updated: February 12, 2016 23:51 IST