प्रवीण साळुंके मालेगावयेथील महसूल विभागासह अनेक कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टाहो फोडावा लागत आहे. यातील विशेष म्हणजे महानगरपालिकेनेही शहरात अशी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. येथील महसूल विभागाच्या तहसील, प्रांत, अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक कार्यालयांत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्याचा गोषवारा असलेल्या तहसील व प्रांत कार्यालयात वर्षाच्या बारमाही गर्दी असते. ग्रामीण भागातील जनतेला कामासाठी दिवस दिवसभर थांबण्याची वेळ येते. अशा वेळी या कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना कार्यालयाबाहेर जाऊन व्यावसायिकांकडे पाण्याची मागणी करावी लागते. या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून जार मागविण्यात येतात. या जारमधून काही जण पाणी पितात. मात्र ग्रामीण अशिक्षित जनता कोणी रागवेल यामुळे पाण्यापासून वंचित राहते. त्यांना तहान असह्य होऊ लागल्यास परिसरातील चहाच्या टपऱ्यांचा आसरा घ्यावा लागतो. असाच काहीसा प्रकार येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसून कार्यालयाच्या आतमध्ये पाण्याचा जार ठेवण्यात येतो. या जारचे पाणी पिण्यास जाण्यासाठी अधिकाऱ्यांना ओलांडून जावे लागते. त्यामुळे अनेकजण येथील पाणी पिण्याचे टाळतात. या तीनही कार्यालयात पाण्यासाठी स्वतंत्र माठ ठेवण्यात आलेले नाही. येथील उपविभागाय कार्यालयात गेल्या वर्षभरापासून पाण्याचे कुलर पडून आहे. ही इमारत अनधिकृत असल्याने शासनाच्या नियमानुसार येथे नळजोडणी करता येत नाही. नवीन असलेले हे कुलर अद्याप खोक्यातून बाहेरही काढण्याचे कोणी कष्ट घेतलेले नाही.
पिण्याच्या पाण्यासाठी टाहो
By admin | Updated: March 21, 2016 22:59 IST