नामपूर : येथील झेंडा चौकातील ग्रामपुरोहित अरुण रामचंद्र उपासनी (५७) यांचे स्वाइन फ्लूसदृश आजाराने निधन झाले. नामपूरकरांच्या मनात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाइन फ्लूचा जिल्ह्यातील आठवा बळी आहे.अरुण उपासनी यांना थंडी, तापाचा त्रास जाणवू लागल्यामुळे नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सांगण्यात आले. नाशिक येथील आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांनीही वृत्ताला दुजोरा दिला आहे.रविवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान त्यांचे पार्थिव नामपूर येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, त्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)साथीचे रोगनामपूर येथे साथीचे रोग बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पसरतात. मात्र येथे एकही आरोग्यसेविका राहत नाही. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाही. येथे कायमस्वरूपी आरोग्यसेविका राहील याची आरोग्य खात्याने सुविधा करावी. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. खोकला, सर्दी, पडसे, घशात खवखव जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन फुलसुंदर गायधनी यांनी केले आहे.
नामपूरला एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By admin | Updated: February 22, 2015 23:46 IST