नाशिक : गृहलक्ष्मी म्हणून महिलांना संबोधले जात असले तरी कर्ता मात्र पुरुषच असल्याचे बोलले जाते. माझ्या महिलाच या घरातील खऱ्या ‘मुखिया’ संपूर्ण जबाबदारी त्या लीलया पार पाडत असतात, असे प्रतिपादन गुलाब गॅँगच्या संस्थापक संपत पाल देवी यांनी केले. प्रसाद मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना संपत पाल देवी म्हणाल्या की, महिलांनी आपली ताकद ओळखायला हवी. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मी कट्टर समर्थक असल्याचे सांगत चांगल्या लोकांचा मी नेहमीच आदर करीत असल्याचे सांगितले. तसेच गुलाब गॅँग राजकीय पक्ष नसून सामाजिक परिवर्तनाकरिता लढणारी संस्था असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, गायिका गिता माळी, मिसमाह महिला मंडळाच्या शहजादी बाजी, अॅड. सुलभा सांगळे, सामाजिक कार्यकर्ती मधू अरविंद, प्रदूषण मुक्ती चळवळीच्या प्राजक्ता बस्ते यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, शिवाजी सहाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले. तर सूत्रसंचालन स्मिता पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)
स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण
By admin | Updated: March 8, 2015 01:48 IST