एकलहरे परिसरात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:01 AM2020-02-10T00:01:26+5:302020-02-10T00:55:25+5:30

मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट श्वानांचे चावा घेण्याचे प्रकार व उपद्रवामुळे रहिवासी एकटे बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. रात्री-बेरात्री एकलहरे वीज केंद्रात कामावर येणारे व जाणारे कामगार तसेच शालेय विद्यार्थी यांच्यातदेखील दहशत पसरली आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Swarms of Mokat dogs in solitary areas | एकलहरे परिसरात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी

एकलहरे परिसरात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी

googlenewsNext
ठळक मुद्देचावा घेण्याचे प्रकार : कामगार, महिला, विद्यार्थी यांच्यात भीतीचे वातावरण

एकलहरे : परिसरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट श्वानांचे चावा घेण्याचे प्रकार व उपद्रवामुळे रहिवासी एकटे बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. रात्री-बेरात्री एकलहरे वीज केंद्रात कामावर येणारे व जाणारे कामगार तसेच शालेय विद्यार्थी यांच्यातदेखील दहशत पसरली आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी, देशमुखवाडी, पहाडीबाबा वस्ती यांसह सामनगाव हद्दीतील झोपडपट्टीलगत भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने रहिवासी, शालेय विद्यार्थी, शेतकरी यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. एकलहरे गेट नंबर दोनपासून चेमरी नंबर एकच्या गेटपर्यंत सिध्दार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी, पेट्रोलपंप परिसरात मोकाट श्वान झुंडीने फिरतात.
परिसरातील अस्वच्छता, घाण, केरकचरा, डुकरांचे वास्तव्य यामुळे या मोकाट श्वानांना चांगले खाद्य मिळते. परिसरातील मटणाची दुकानेही या मोकाट श्वानांच्या वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. हनुमाननगर परिसरात हे श्वान दबा धरून बसतात व वाहनचालकांवर हल्ला करतात. महापालिका हद्दीतून पकडलेल्या श्वानांना किर्लोस्कर टेकडीच्या पायथ्याशी सोडले जात असल्याने श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

वाहनधारकांकडून पर्यायी मार्गाचा वापर
रात्री-बेरात्री वाहनधारकांच्या मागे लागत धावत भुंकतात. यामुळे दुचाकी व वाहनधारकांची तारांबळ उडते. या मोकाट श्वानांचा त्रास टाळण्यासाठी वाहनधारक एकलहरे वसाहतीतील पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. गेल्या काही दिवसांपासून हे श्वान कोठून आले, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. नाशिक महापालिका हे मोकाट श्वान ग्रामपंचायत हद्दीत आणून सोडतात, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट श्वान महानगरपालिका कर्मचारी एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत आणून सोडतात. तसेच काही मांसविक्रेते उघड्यावर, रस्त्याच्या कडेला पक्ष्यांचे टाकावू अवयव टाकतात. त्यामुळे मोकाट श्वान रस्त्यावरच टोळीने उभे राहतात व त्याचा त्रास ग्रामस्थांना होतो. ग्रामपंचायतीने नोटीस बजावूनही सदर व्यावसायिक उपाययोजना करत नाहीत. नाशिक महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही ग्रामपंचायत हद्दीत मोकाट श्वान आणून सोडतात.
- मोहिनी जाधव,
सरपंच, एकलहरे

गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान मंडळी दुचाकी, चारचाकीधारक व पादचाऱ्यांच्या मागे लागत असल्याने तारांबळ उडून अपघात होत आहेत. श्वानांच्या दहशतीमुळे रहिवासी पर्यायी मार्गाने जात आहेत. मोकाट श्वानांचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे.
- तानाजी ढोकणे, शेतकरी, सामनगाव

Web Title: Swarms of Mokat dogs in solitary areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.