घोटी : इगतपुरी तालुक्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे भातपीक भिजल्याने नुकसान झाले. या पिकांची पाहणी राज्याचे नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी केली. बेमोसमी पावसाने शेतातील भातपिकांचे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाले. लागवड व उत्पादन खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी होऊ लागल्याने नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी बेलगाव तऱ्हाळे, धामणी भागाचा पाहणी दौरा केला.विभागीय आयुक्त एकनाथ डवले, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, तहसीलदार महेंद्र पवार, सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी आदिचा पथकात समावेश होता. पथकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात पिकांची व नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.दरम्यान पीकविमा योजनेचा लाभ घेतला असल्याने नुकसान लक्षात घेऊन विमा योजना मंजूर करावी. तसेच वीजबिले माफ करावीत, अशी मागणी शिवाजी भोसले, विष्णू भोसले, नामदेव आव्हाड, संजय आव्हाड, तानाजी आव्हाड, पोपट आव्हाड, रघुनाथ आव्हाड, पंढरी वारुंगसे,गौतम भोसले, कैलास वारुंगसे, हिरामण आव्हाड, समाधान वारुंगसे, चंदू आव्हाड आदि शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)
नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी केली पिकांची पाहणी
By admin | Updated: November 21, 2014 01:07 IST