नाशिक : सिडकोतील प्रभाग २४ मधील भुजबळ फार्मजवळ असलेल्या सुंदरबन कॉलनीतील रस्ताच बॅरिकेड टाकून वाहतुकीसाठी बंद करून टाकण्यात आल्याने रहिवाशांना डोकेदुखी ठरली आहे. शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी ही नाकाबंदी केल्याची तक्रार संबंधित रहिवाशांनी शिवसेनेचेच स्थानिक नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे केल्यानंतर तिदमे यांनी याबाबत प्रभाग समितीच्या सभेतही आवाज उठविला आहे. परंतु, महापालिकेकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे तिदमे यांनी सांगितले. प्रभाग २४ मधील सुंदरबन कॉलनीत माजी महापौर विनायक पांडे यांचे निवासस्थान आहे. मात्र, या कॉलनीत प्रवेश करणाºया रस्त्यावर बॅरिकेड टाकून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहने नेताना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. सार्वजनिक रस्ता अशाप्रकारे बंद करण्याच्या या घटनेने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सदरचा रस्ता माजी महापौरांच्या आदेशावरूनच बंद करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी अखेर प्रभागाचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे केली. तिदमे यांनी प्रभाग समितीच्या सभेत सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिली. परंतु, अद्याप महापालिकेने कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
माजी महापौरांकडून सुंदरबन कॉलनीत नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:05 IST