पेठ : आदिवासी विकास विभागाच्या कोहोर येथील शासकीय आश्रम-शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्त्या केल्याने शासकीय आश्रमशाळांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कोहोर येथे आदिवासी विकास विभागाची पहिली ते बारावीपर्यंतची शासकीय निवासी आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला कैलास रामदास चव्हाण (१६) हा विद्यार्थी सहामाही परीक्षेचा पेपर देऊन सायंकाळी मित्राबरोबर वसतिगृहावर गेला. रात्री जेवण करून सर्व मुले आपापल्या खोलीत झोपले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कोहोर बसस्थानकानजीक कडुलिंबाच्या झाडाला कैलास याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. याबाबत ग्रामस्थांनी शाळा प्रशासन व कैलासच्या कोहोर येथील नातेवाइकांना कळवले. पहाटेच्या वेळी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचे दिसून आले. याबाबत पेठ पोलिसात आकस्मित नोंद करण्यात आली असून, आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. मात्र यामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
कोहोर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: October 22, 2016 22:38 IST