नाशिक : जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी देवळा व बागलाण तालुक्यातील समाजकल्याण विभागाअंतर्गत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना दिलेल्या भेटीत अनेक धक्कादायक माहिती उघड झाली असून, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबतही प्रचंड तफावत आढळल्याने अनुदान लाटण्याचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी सभापती झाल्यानंतर प्रथमच अनुदानित वसतिगृह व आश्रमशाळांना भेटी दिल्या. देवळा तालुक्यातील कमला नेहरू छात्रालय- दहीवड, साने गुरुजी विद्यार्थी वसतिगृह- देवळा, पुष्पाताई हिरे विद्यार्थी वसतिगृह- उमराणे (देवळा), महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह- उमराणे (देवळा), महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह- करंजवाड (बागलाण) या आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी दिल्या. त्यातील एका वसतिगृहात विद्यार्थ्यांची पटसंख्या ४० दाखविलेली असताना प्रत्यक्षात एकच विद्यार्थी हजर असल्याचे पाहून उषा बच्छाव यांना धक्काच बसला. तसेच सर्वच वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये आवश्यक शौचालयांची व्यवस्था नाही, शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना गणवेश नाही, लेखन साहित्य अपूर्ण व विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नसल्याचे त्यांच्या भेटीत तसेच तपासणीत आढळून आले. याबाबत या सर्व अनागोेंदी कारभारात सुधारणा करण्याासाठी उषा बच्छाव या प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. केलेल्या सूचनांनुसार सुधारणा न झाल्यास संस्थांच्या अनुदान कपातीसाठी शिफारस करणार असल्याचेही सभापती उषा बच्छाव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अचानक तपासणी : अनुदानित वसतिगृहांची
By admin | Updated: November 14, 2014 00:28 IST