एकाच परिसरात तीन दिवसात दोन बिबटे वनविभागाच्या हाती लागल्याने या भागात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असल्याचे दिसते. गेल्या आठवडाभरापासून वडांगळी शिवारात बिबट्यांचा वावर होता. वनविभागाने वडांगळी शिवारात पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. गेल्या गुरुवारी सायंकाळी खडांगळी शिवारात निवृत्ती कोकाटे यांना मका पिकाला पाणी देताना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या काही तासांत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. कोकाटे यांच्या शेतशिवाराशेजारी कैलास सुभाष ठोक यांना रविवारी दुपारी अजून एक बिबट्या दिसून आला. ठोक यांच्या मक्याच्या शेतात बिबट्याने आश्रय घेतला होता. या घटनेची माहिती रविवारी सायंकाळी वनविभागाला देण्यात आली. नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक टी. ब्यूअला, सहायक वनसंरक्षक प्रदीप भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनरक्षक ए. बी. साळवे यांनी तातडीने खडांगळी शिवारात कैलास ठोक यांच्या मक्याच्या शेतात पिंजरा लावला. गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वडांगळी शिवारात वावर होता. त्याने पाळीव कुत्रे फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वडांगळी शिवारात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र त्यानंतर खडांगळी शिवारात बिबट्या दिसून आल्याने गुरुवारपासून पिंजरा खडांगळी शिवारात हलविण्यात आला होता. या शिवारात तीन दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. पहिला बिबट्या सुमारे दोन वर्षे वयाचा नर जातीचा आहे. सोमवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्याही नर जातीचा आहे.
तीन दिवसात दोन बिबटे पकडण्यात यश
By admin | Updated: March 13, 2017 22:58 IST