नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रयत्नाने साधुग्राम आणि गणेशवाडी येथे विजेचे उपकेंद्र उभाण्यात आले आहे. अगोदर निधी आणि नंतर जागेच्या मुद्द्यावरून सबस्टेशनच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत महावितरणने दोन उपकेंद्रं उभारले असले, तरी नदीपात्रात असलेल्या पाच उच्चदाब वाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्यापही कायम आहे. महावितरण कंपनीने सिंहस्थासाठी सुमारे २४ कोटी ५६ लाखांचा आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. प्रारंभी महावितरणचा खर्च सिंहस्थ निधीतून करावा की महावितरण कंपनीने स्वत: निधी उभारावा यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर सिंहस्थ निधीतच तरतूद करण्यात आली आणि महावितरणने सिंहस्थाची कामे सुरू केली. इतर खात्यापेक्षा महावितरणचे काम कमी असले तरी महत्त्वाचे होते. यामध्ये सर्वात मोठे काम होते ते सबस्टेशन उभारणीचे. शहरातील उपकेंद्रांमधून साधुग्रामसाठी वीज पुरविणे शक्य नसल्याने नवीन सबस्टेशन करणे गरजेचे होते. परंतु पालिकेकडे जागा नसल्याने हा प्रश्न काही महिने रेंगाळला होता. अखेर पालिकेने गणेशवाडी आणि साधुग्राममधील दोन जागांची एनओसी दिल्यानंतर सबस्टेशन कामाला सुरुवात करण्यात आली. दोन्ही सबस्टेशनचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. ३३ केव्ही लाईन्स सबस्टेशनपर्यंत आणण्यात आल्या आहेत. परंतु ११ केव्ही वाहिनी टाकण्याचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. जोपर्यंत ११ केव्हीचे काम होणार नाही तोपर्यंत उपकेंद्र दुबळे ठरणार आहे.
सबस्टेशन झाले; उच्च वाहिन्यांचे स्थलांतर कधी?
By admin | Updated: April 13, 2015 01:02 IST