नाशिकरोड : नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत मद्याच्या नशेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मंगळवारी काळजीवाहू कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. पांढरी काठी दिनाच्या दोन दिवसांपूर्वी नासर्डी पूल समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत शुक्रवारी रात्री कनिष्ठ काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याने दारूच्या नशेत चंद्रा बटाला, अजय सोनवणे, सागर मुरकुटे व सुरदास पावसे या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी, बॅटने गंभीर मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा शनिवारी दुपारी कांबळे याने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे अंध विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती व दहशतीचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची तक्रार अंध विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. रविवारी सुट्टीच्या दिवशी संबंधित विद्यार्थ्यांचा नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत लोकमतच्या (१६ आॅक्टोबर) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. सोमवारी समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनीदेखील शासकीय अंधशाळेस भेट देऊन घडलेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती घेतली होती.याबाबत अंध शाळेच्या अधीक्षिका एम. एम. वांझट यांच्याशी संपर्क साधला असता कनिष्ठ काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याला कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आल्याचे सांगितले. त्याकरिता तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर कर्मचारी कांबळे हा आपल्या गावी गेल्याचे बोलले जात आहे. तर समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील हे मंगळवारी मुंबई मंत्रालयात कामानिमित्त गेल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अंध विद्यार्थ्यांबाबत घडलेल्या या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्या चिठ्ठीत दडलंय काय?अंध विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर शासकीय अंधशाळेत समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनी सोमवारी भेट देऊन घडलेल्या या घटनेची माहिती घेतली. यावेळी अंध विद्यार्थ्यांनी ‘गुपचूप’ पाटील यांना चिठ्ठी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे त्या चिठ्ठीत शाळेतील कारभाराबाबत आणखीन काय दडलंय हे मात्र गुलदस्त्यात आहे.अंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाºया काळजीवाहू कर्मचाºयावर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. सदर घटना अतिशय संतापजनक असल्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. संबंधितास अटक करण्याची मागणी आहे.- मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सामाजिक कार्यकर्ते
शासकीय अंधशाळेत विद्यार्थ्यांना मारहाण ; ‘त्या’ कर्मचाऱ्यास निव्वळ नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:51 IST