लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव कॅम्प : सध्या कोरोनाने सर्वत्र हात पसरले आहेत. नागरिकांत काहीशी भीती पसरली आहे; तर कोरोनाच्या नावाने सोशल मीडियावर उपदेशाचे डोस पाजण्याची एकच स्पर्धा सुरू झाली आहे. मालेगावी या संदेशामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. हे संदेश अनेकांची डोकेदुखी ठरत आहेत.
शहरात सोशल मीडियावर जसे व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटरवर या कोरोना उपचार व उपचाराबाबतीत संदेशांची भाऊगर्दी होत आहे. यात कोरोना झाला अथवा होऊ नये, यासाठी उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. जसे अल्पावधीत प्रसिद्ध झालेला मालेगाव काढा, मालेगाव पॅटर्न, मास्क घाला कोरोना टाळा, रक्तदान करा, वड, पिंपळसारखी झाडे लावा व ऑक्सिजन मिळवा, पालथे झोपून नैसर्गिक वायू मिळवा, कापूर, ओवा पूड जवळ ठेवा, वारंवार हात धुवा, वाफ घ्या, आदी मोफत सल्ला दिला जात आहे. त्याबाबतीत संदेश परत, परत धडकत आहेत. एकसारखे संदेश वारंवार मोबाईलवर येत आहेत. त्यामुळे नेटकरी काहीसे वैतागले आहेत. यावर अजून काहीजण कोरोना संक्रमणावर संपूर्ण घरगुती उपचार औषध सुचवत आहेत तर नियमित व्यायामाचे प्रकार, योगासने कोणत्या प्रकारची करावी, तेही सांगितले जात आहे. तसेच दररोजचा आहार यात अंडी, मांसाहार घेण्यासाठी आग्रह केला जात आहे. दिवसभर गरम पाणी पिणे, हळदीचे दूध, काढा, लिंबूपाणी, तपकिरी सुंगणे, या उपचारांची यादी पाठवली जात आहे. उपचार घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नावे, फोन नंबर पाठवले जात आहेत, तर कोविड केंद्राची माहिती, शहरातील पूर्व व पश्चिम भागातील डाॅक्टरांची उपचार पद्धती, कोण डॉक्टर किती चांगले आदी संदेशाची जंत्री सध्या सोशल मीडियावर येऊन धडकत आहे. कोणी कुठवर अंमलबजावणी करायची, यावर चर्चा होत आहे. काही संदेश कामाचे ठरतात तर अनेक संदेश ‘फेक’ बनावटी असतात. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. फेक व बनावट संदेशाच्या माहितीमुळे संबंधित व्यक्ती हतबल होतो तर याची शहानिशा करण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करावे लागते. त्यामुळे या सोशल मीडियावर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न शहरातील अनेक नागरिकांनी पडला आहे.