निषेध : जिल्ह्यातील अडतसंदर्भात कांदा खरेदी-विक्री बंद अभोणा : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध कांदा-बटाटा खरेदीदार व्यापाऱ्यांनी गेल्या १२ दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी बंद केली होती. त्यावर शासनाने तडजोड करून कृषी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यातील फळे, भाजीपाला खरेदी सुरू केली आहे. व्यापारी ते ग्राहक असा व्यापार सुरू केला आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी अडतसंदर्भात आडमुठेपणाचे धोरण घेऊन कांदा खरेदी-विक्री बंद केल्याने परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी १ वाजेदरम्यान येथील चार रस्त्यांना जोडणाऱ्या चौफुलीवर रास्ता रोको करून जवळपास दोन तास वाहतूक बंद केली. यावेळी भाई दादाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भामरे, अण्णासाहेब मराठे, हरिश्चंद्र देसाई, मधुकर भदाणे, संतोष देशमुख आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. शासनाने योग्य निर्णय घेऊन सोमवारपासून कळवण कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने गेल्या सात दिवसात कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा प्रत्यक्ष फटका हा शेतकऱ्यांना, तर अप्रत्यक्षरीत्या नागरिकांना बसला आहे. पावसाने शेतकऱ्यांमध्ये जरी आनंदाचे वातावरण असले तरी दुसरीकडे बाजार समितीचे लिलाव प्रक्रियेचे कामकाज बंद असल्याने शेतीसाठी औषध, अवजारे आणावे कुठून यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी झाली असून, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. राजू पाटील, संतोष देशमुख, विजय देसाई, पंडित वाघ, विजय चव्हाण, बाबाजी वाघ, गिरीश देवरे, विठ्ठल ढुमसे, योगेश वेढणे, सोमनाथ सोनवणे, दीपक सोनजे, शेखर जोशी आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
अभोण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: July 23, 2016 00:18 IST