पाथर्डी फाटा : उन्हाळ्याची तीव्रता आणि मे महिन्यातील नियोजित आवर्तन न सोडल्याने निर्माण झालेली पाणीटंचाईच्या समस्येने हैराण पाथर्र्डी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वालदेवी नदीला पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना उप महानगरप्रमुख सुदाम डेमसे यांनी दिली. पाथर्डी पंचक्रोशीतील गौळाणे, पाथर्डी, वाडीचे रान, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला आदि गावांतील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना वालदेवी नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गेली दोन महिने वालदेवी नदीला धरणातून पाणी न सोडल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लष्करी हद्दीतील जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांनाही जलस्तोत्र म्हणून वालदेवीचेच पाणी कमी येते. मात्र नदीचे पात्र व बंधारे कोरडे पडल्याने जनावरांचे हाल होत आहेत. त्यातही मे महिन्याच्या अखेरीस नियमानुसार असलेले आवर्तनही सोडण्यात न आल्याने समस्या गंभीर बनली असल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर सुदाम डेमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आवर्तन सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. (वार्ताहर)
वालदेवी नदीला आवर्तन सोडण्यासाठी साकडे
By admin | Updated: June 2, 2016 22:51 IST